Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी देशात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. तर यंदाच्या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सकारात्मक आणि स्वागतार्ह आहे. या अर्थसंकल्पात बिहारच्या गरजांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या अंतर्गत बिहारच्या मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
विधानसभेत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ”या अर्थसंकल्पात बिहारमधील रस्ते जोडणी प्रकल्प, वीज प्रकल्प, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रीडा संरचनेसाठी विशेष रकमेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बिहारमधील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे. बिहारला पुरापासून वाचवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोसी-मेची नदी जोड प्रकल्प, नदी प्रदूषण कमी आणि सिंचन प्रकल्पांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे, ती स्वागतार्ह आहे.”
बिहारच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विशेष आभार मानले. अर्थसंकल्पात बिहारसाठी केलेल्या या घोषणांमुळे बिहारचा विकास होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. तसेच भविष्यातही केंद्र सरकार अशाच प्रकारे बिहारच्या विकासासाठी इतर गरजांसाठी मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. केंद्र सरकारने कालच्या अर्थसंकल्पात बिहारची २६ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.