Pune Rain Updates : पुण्यासह महाराष्ट्र्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच अनेक धरणे देखील भरली आहेत. आज पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सलग सुरु असलेल्या पाऊसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील शाळा, महाविद्यालये तसेच कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढाव घेत नागरिकांना सूचना दिल्या आहेत.
अजित पवार यांनी थोड्या वेळापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपायोजना करण्यासंदर्भात आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचेही आवाहन केले आहे.