Pune Rain Updates : पुण्यात गेल्या २४ तासात मुसळधार झाला आहे. त्यामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तसेच पुण्यातील अनेक भागांमधील घरे देखील पाण्याखाली गेली आहेत, सध्या पुण्यातील वेगवेगळ्या ठिकणी बचाव कार्य सुरु आहे. अनेक भागात पाणी साचल्याने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे.
दरम्यान, कात्रज भागात देखील अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. कात्रज पेशवे तलाव पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी पाटबंधारे मार्फत तलावाचे पाणी अडवण्यासाठी असलेली पूर्णपणे खोलण्यात आली आहे. त्यामुळे कात्रज नवीन वसाहत येथील नाल्यातून राजीव गांधी प्राणीसंग्रहालय ओढा येथून आंबील ओढ्यामध्ये पाणी पुढे जात आहे. अशास्थितीत या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे शहरात कालपासून जोरदार पाऊसाची बॅटिंग सुरु असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील मंदिरे, घरे आणि इतर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी साचले आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे बहुतेक ठिकाणी पाणी साचले असून, पुण्यातील अनेक मंदिरे देखील पाण्याखाली गेली आहेत. तसेच अनेक ठिकणी बचाव कार्य देखील सुरु आहे.