Kanwar Yatra : गेल्या काही दिवसांपासून कावड यात्रा चर्चेत आहे. कावड यात्रेच्या मार्गी असलेल्या दुकानांच्या नेमप्लेट वरून पेटलेला वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला स्थगिती कायम ठेवली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ ऑगस्टला होणार आहे.
आमचे आदेश स्पष्ट असल्याचे न्यायालायने या निर्णयात म्हटले आहे. “स्वत:च्या इच्छेने दुकानाबाहेर कोणाला आपले नाव लिहायचे असेल, तर आम्ही त्याला रोखलेले नाही. नावे लिहिण्याची सक्ती करता येणार नाही”, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी यूपीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रेपूर्वी आवश्यक निर्देश जारी केले होते. सरकारच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्ससह प्रत्येक फूड स्टॉलच्या मालकांना त्यांच्या नावाचा बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले होते. हा नियम मुझफ्फरनगरपासून सुरू झाला. त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाने कावड यात्रेकरूंच्या मार्गावर येणाऱ्या दुकानांवर त्यांच्या मालकांची नावे लिहिण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 19 जुलै रोजी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती आणि संपूर्ण राज्यातील कावड यात्रेकरूंच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक दुकानाच्या मालक आणि दुकान चालवणाऱ्या व्यक्तीचे नावे लिहिण्याचे निर्देश दिले होते. जे दुकानदार याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.