Murlidhar Mohol : पुण्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे नदीपात्राजवळील घरे मंदिरे पाण्याखाली गेली. तसेच सिंहगड विभागात अनेक ठिकाणी नुकसान झाले.
काल पुण्याचे पालकमंत्री अजित पवार देखील सिंहगड विभागात पाहणीसाठी उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासनही दिले.
पुणे शहरासह जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देशही मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
तसेच धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांना कळवावे, जेणेकरुन त्यासूचना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. नदीपात्रावरील गावातील नागरिकांना स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून धरणातील पाणी विसर्गाबाबत सूचना द्याव्यात. शहरातील पुरबाधित भागात सीसीटिव्ही यंत्रणा कायान्वित करण्यात यावी. महावितरणच्यावतीने खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पुर्वरत करावा. पुणे शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी, असेही मोहोळ म्हणाले.