सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीने महायुतीला चांगलाच धोबीपछाड दिला आहे. त्यानंतर राज्यात महायुती सावध झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्तावाटपाच्या चर्चेला देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेग आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीचे महत्वाचे नेत्यांनी अनेकदा दिल्लीवारी केली आहे. तर आज देखील हे शीर्ष नेते दिल्लीला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान दिल्लीवारी करण्यामागचे कारण अजून समजलेले नाही.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण पुढे आलेले नाही. एकनाथ शिंदे नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची दिल्ली वारी कशासाठी आहे व कोणासोबत बैठक होणार आहे हे कळू शकलेले नाही. सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. रस्सीखेच देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्यात काय घडते ते पाहणे महत्वाचे असणार आहे.