Delhi : महाराष्ट्रासह दिल्ल्लीमध्ये देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे, अशातच दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पावसामुळे दिल्लीतील राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तळघरातील वाचनालयात सुमारे 30 विद्यार्थी शिक्षण घेत असताना अचानक तेथे पाणी भरू लागले. या अपघातानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
या प्रकरणी दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ही घटना कशी घडली हे शोधण्यासाठी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही.
दिल्लीतील राजेंद्र नगर भागात असलेले राव आयएएस कोचिंग सेंटर अचानक पावसाच्या पाण्याने भरले. त्यावेळी कोचिंग सेंटरच्या तळघरात बांधलेल्या वाचनालयात सुमारे 30 विद्यार्थी होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या येथे पाठवण्यात आल्या. तोपर्यंत विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्याने तळघरातून बाहेर काढले जात होते.
विद्यार्थी रस्त्यावर उतरले
दिल्ली कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने सह विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोषींना शिक्षा व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. रस्त्यावर उतरून विद्यार्थी दिल्ली सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत, तसेच याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मंत्री आतिशी यांनी दिले चौकशीचे आदेश
दिल्लीतील आप सरकारचे जल बोर्ड मंत्री आतिशी यांनी विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून, या घटनेच्याचौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी आल्याने तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तिन्ही विद्यार्थी यूपीएससीची तयारी करत होते. शनिवारी संध्याकाळी ते तळघरात बांधलेल्या वाचनालयात अभ्यास करत असताना ही घटना घडली. मृतांमध्ये श्रेया (२५ वर्षे), नेविन डेल्विन (२८ वर्षे) आणि तानिया (२५ वर्षे) यांचा समावेश आहे.