US Election : उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी विजय आमचाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कमला हॅरिस यांनी सोशल मीडिया X (ट्विटर) वर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज मी अधिकृतपणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करणाऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी केली आहेत. प्रत्येक मत मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन आणि नोव्हेंबरमध्ये आम्हीच जिंकू.”
दरम्यान, ओबामांनी देखील कमला हॅरिस याना पाठींबा दर्शवला आहे. बायडेन यांच्या पाठिंब्यानंतर उपराष्ट्रपती कमला हॅरिस येत्या 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून दिसणार आहेत. बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर ओबामा यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना जाहीरपणे पाठिंबा दिला.
याआधी अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मिशेल ओबामा यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बनवण्याची अटकळ होती. पण मिशेल यांनी एका मुलाखतीत राजकारणापासून दूर राहणार असल्याचे सांगत सर्व अटकळ फेटाळून लावल्या होत्या. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर ओबामा खूश नसल्याचा दावाही अनेक प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला होता. पण आता ओबामा दाम्पत्याने कमला हॅरिस यांना पाठिंबा दिल्यानंतर सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. आता डेमोक्रॅटिक पक्षात अध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्यासाठी 1 ऑगस्टला मतदान होणार आहे. यामध्ये कमला हॅरिस यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.