Delhi Old Rajendra Nagar Accident : दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राव IAS कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई सुरू आहे. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये या बिल्डिंगच्या मालकाला देखील अटक करण्यात आले.
रविवारी दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरच्या मालक आणि समन्वयकाला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली आहेत.
एमसीडीला नोटीस बजावणार
जुन्या राजेंद्र नगर दुर्घटनेबाबत दिल्ली पोलिस एमसीडीला नोटीसही बजावणार आहेत. एमसीडीच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. सध्या दिल्ली पोलीस कोचिंग सेंटरशी संबंधित पेपर्स तपासण्यात व्यस्त आहेत.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
याशिवाय या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. कारण दिल्ली जल बोर्ड हे दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येते, त्यामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी दिल्ली जल बोर्डाची होती, त्यामुळे दिल्ली सरकार जबाबदार आहे.
काय आहे प्रकरण?
शनिवारी राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी आल्याने तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तिन्ही विद्यार्थी यूपीएससीची तयारी करत होते. शनिवारी संध्याकाळी ते तळघरात बांधलेल्या वाचनालयात अभ्यास करत असताना ही घटना घडली.
हा अपघात झाला त्या इमारतीच्या तळघरात बेकायदा कोचिंग सेंटर सुरू होते. परवानगीशिवाय तळघरात वाचनालय सुरू होते, ते कायदेशीर नव्हते. ज्या तळघरात ही घटना घडली ती जागा साठवणुकीसाठी वापरली जात होती, मात्र येथे वाचनालय बांधण्यात आले होते.