आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे तर राज्यासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. राज्य सरकारने अर्थसंकल्पावेळी अनेक योजना राज्यात आणल्या आहेत. दरम्यान महायुतीमधील आणि महाविकासघडीमधील प्रत्येक पक्षाने स्वतःची स्वतंत्र अशी देखील तयारी सुरू केली आहे. युती म्हणून लढायचे असले तरी आपला पक्ष किती जागा लढणार आणि कोणत्या ठिकाणी लढवणार यासाठी चाचपणी सुरु झाली आहे. शिवसेना पक्षाने देखील त्यासाठी निरीक्षक आणि प्रभारी यांची नियुक्ती केली आहे.
महायुतीत मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षाने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी पक्षाकडून ४६ प्रभारी आणि ९३ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभेत महायुतीमध्ये शिवसेना १०० जागांसाठी आग्रही असेल अशा चर्चा सुरू आहेत.
शिवसेना पक्षाने ११३ विधानसभा मतदारसंघात ९३ विधानसभा निरीक्षक आणि ४६ प्रभारी नेमले आहेत. विधानसभा निवडणूक येत्या २ महिन्यात कधीही होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेने कम्बर कसली असून, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस देखील तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर महायुती अत्यंत सावधपणे प्रत्येक डाव किंवा रणनीती आखताना दिसत आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका व इतर प्रश्न याकडे राज्य सरकार व विरोधक कसे पाहतात, यावर निवडणुकीचा निकाल अबलंबून असण्याची शक्यता आहे.