Kerala Landslide News : केरळमधील वायनाड या जिल्ह्यात भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना मंगळवारी सकाळी मेप्पाडी जवळ घडली. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे.
या भागात नागरिकांच्या मदतीसाठी अग्निशमन दल आणि NDRF टीमला तैनात करण्यात आले आहे, येथे बचाव कार्य सुरु असून, नागरिकांना सुखरुप ठिकाणी नेलं जात आहे. माहितीनुसार मातीच्या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकलेले असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा कमला लागली असून, हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. एनडीआरएफ आणि सिव्हिल डिफेन्सचे पथक वायनाडमध्ये उपस्थित असून नौदलाचे एक पथकही तेथे लवकरच पोहोचणार असल्याचे म्हंटले जात आहे.
https://x.com/RahulGandhi/status/1818118734722265583
वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनाच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या घटनेने दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे अजूनही अडकले आहेत त्यांची लवकरच सुखरूप सुटका होईल. मी केरळचे मुख्यमंत्री आणि वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांनी मला आश्वासन दिले आहे की बचाव कार्य सुरू आहे. मी त्यांना विनंती केली आहे की, एक नियंत्रण कक्ष स्थापन करावा आणि मदत कार्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही मदतीबद्दल आम्हाला कळवावे. मी केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि त्यांना वायनाडला शक्य ती सर्व मदत देण्याची विनंती करेन.”