केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळ डोंगराळ भागात मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस कोसळत असतानाच येथे भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. फायर फोर्स आणि एनडीआरएफच्या टीम्सना प्रभावित क्षेत्रात तैनात करण्यात आले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. या घटनेदरम्यान भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान या वायनाड मधील दुर्घटनेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या ट्विटर हँडल ‘X’ वर लिहिले की, “केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात लोकांच्या मृत्यूमुळे मी दु:खी आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करते तसेच जखमीं लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे”.
उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी ‘X’ वर पोस्ट केले की, “केरळमधील वायनाड येथे भूस्खलनामुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या याबाबतच्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हंटले आहे की .” मी त्या सर्वांसोबत आहेत ज्यांनी प्रियजन गमावले आहेत आणि तसेच जे जखमी झाले आहेत. मी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो” .
पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, वायनाडमध्ये बचावकार्य सुरू आहे. या संदर्भात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर पोस्ट केले आहे की पंतप्रधानांनी वायनाडच्या काही भागात भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांबाबत मी अत्यंत चिंतित असल्याचेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हंटले आहे.मृतांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.तसेच एनडीआरएफ युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य करत आहे. दुसरी टीम ऑपरेशनला आणखी मजबूत करण्यासाठी रवाना झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.