मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे नाव समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीसाठी निमंत्रित केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांना पुढच्या रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी कुटुंबासह पंतप्रधानांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभेतील अपयशाची फडणवीसांनी घेतली जबाबदारी
लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारचा निकाल लागला, त्याकडे फडणवीस यांच्याकडे बोटे दाखवली जात होती. स्वतः जबाबदारी घेत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची देखील तयारी दर्शवली होती. परंतू, केंद्रीय नेतृत्वाने एवढ्यात सत्ता सोडू नये, असे समजावत फडणवीस यांना त्यांची भूमिका मागे घेण्यास लावली होती.
फडणवीस यांना खास निमंत्रित
भाजपने 27 आणि 28 जुलै रोजी दिल्लीत आपली सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक बोलावली होती. या बैठकीला फडणवीस यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीनंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पुढच्या रांगेत बसवण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी फडणवीस यांना चर्चेसाठी बोलावले. फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांच्यासह लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
फडणवीसांची पोस्ट
मोदीं सोबतच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत फडणवीसांनी लिहिले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद नेहमीच महाराष्ट्रावर आहेत आणि राहतील. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा नवीन ऊर्जा मिळते आणि त्यांचे मार्गदर्शन मिळते. आज सदिच्छा म्हणून त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत भेटण्याची संधी मिळाली. माझ्यासोबत पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा होत्या. आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.”
https://x.com/Dev_Fadnavis/status/1817586171276661015
महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा
पंतप्रधानांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. भाजप लवकरच फडणवीस यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवू शकते, अशी चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवता याव्यात, यासाठी त्यांना महाराष्ट्रात फ्री हँड मिळण्याची शक्यता आहे.