व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून तीन दिवसीय भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.व्हिएतनामी पंतप्रधानांसमवेत अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यावसायिक नेत्यांसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल.पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह 1 ऑगस्ट रोजी त्यांच्या दौऱ्याचा समारोप करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
त्यांच्या भेटीदरम्यान, व्हिएतनामी पंतप्रधान चिन्ह यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत केले जाईल, त्यानंतर ते महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटाला भेट देणार आहेत. शिवाय, ते पीएम मोदींसोबत द्विपक्षीय चर्चाही करतील, पंतप्रधान मोदी त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजनही करणार आहेत.
पंतप्रधान चिन्ह तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत.परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे व्हिएतनामच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत, असे MEA ने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत सरचिटणीस, गुयेन फु ट्राँग यांना त्यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र समारंभात आदरांजली वाहिली होती. .यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या गुरुवारी हनोई येथे झालेल्या शासकीय अंत्यसंस्कारात भारताचे प्रतिनिधित्व केले.
त्याच बरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील व्हिएतनाम दूतावासाला भेट देऊन भारत सरकार आणि लोकांच्या वतीने शोक व्यक्त केला.
भारत आणि व्हिएतनामचे बऱ्याच वर्षांपासून चांगले संबंध आहेत. जे सप्टेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींच्या व्हिएतनाम भेटीदरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये परिवर्तित झालेले बघायला मिळाले होते.शिवाय, भारत व्हिएतनामला त्याच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा प्रमुख आधारस्तंभ मानतो आणि त्याच्या इंडो-पॅसिफिक व्हिजनमध्ये एक महत्त्वाचा भागीदार मानतो.