Preeti Sudan : 1983 च्या बॅचच्या IAS अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची UPSC च्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान या 1 ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. महिनाभरापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिला होता. मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. प्रीती सुदान या 2022 पासून UPSC सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
कोण आहेत प्रीती सुदान?
प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या (1983) बॅचच्या निवृत्त IAS अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै 2020 मध्ये संपला. महिला आणि बाल विकास मंत्रालयात काम करण्यासोबतच प्रीती यांनी संरक्षण मंत्रालयातही काम केले आहे. आंध्र प्रदेशमध्ये त्या वित्त, नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि कृषी या खात्यांच्या प्रभारी होत्या. प्रीती सुदान यांनी जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
तसेच, प्रीती सुदान यांनी देशात अनेक महत्वाचे कामे केली आहेत. ज्या कामांची दखल आंतरराष्ट्रीय दर्ज्यावर देखील घेतली गेली आहे. बेटी बचाव, बेटी पढाओ तसेच आयुष्यमान भारत मिशनसारख्या योजनेत त्यांनी प्रामुख्याची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर नॅशनल मेडिकल कमिशन, अलाईड हेल्थ प्रोफेशनल्स कमिशन आणि ई-सिगारेटवरील बंदीबाबत कायदे बनवण्याचे श्रेय त्यांना जाते. यूपीएससीच्या प्रमुख बनणाऱ्या प्रीती सुदान या दुसऱ्या महिला आहेत.