केरळमधील वायनाड या जिल्ह्यात मंगळवारी भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत, तर अनेकजण आणखीनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना मंगळवारी सकाळी मेप्पाडी जवळ घडली. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, केरळ सरकारला संभाव्य भूस्खलन आणि मृत्यूंबाबत 23 जुलै रोजी, घटनेच्या एक आठवडा आधी इशारा देण्यात आला होता.
वायनाड भूस्खलनावर सार्वजनिक महत्त्वाचा मुद्दा म्हणून चर्चा करण्यासाठी राज्यसभेने लक्षवेधी प्रस्ताव आणला. या दुर्घटनेत 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.गृहमंत्र्यांनी दावा केला की पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारला वायनाडमध्ये भूस्खलनाच्या एक आठवडा आधी केंद्राने इशारा दिला होता. ते म्हणाले की, दक्षिणेकडील राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर केंद्राने एनडीआरएफच्या नऊ टीम केरळला पाठवल्या होत्या.
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान राजकीय टिप्पण्या आणि आरोपांवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत जेणेकरून देशात कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये.
आतापर्यंत वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी चुरलमालामध्ये बचावकार्य सुरू केले आहे. येथे लष्कराच्या चार तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमही लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.दरम्यान, हवामान खात्याने केरळमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वार्तावली आहे. हवामान विभागाने
केरळमधील पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. वायनाड, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यातही येत्या तीन तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे.