साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४वी जयंती आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या युवा उद्योजक सुशील तुपे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आकाशातील तार्याची नोंदणी केली आहे. हा आकाशातील तारा आजपासून (१ ऑगस्ट) प्रत्येकाला बघता येणार आहे. युवा उद्योजकाने दिलेल्या या अनोख्या अभिवादनामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सुशील तुपे यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर अमेरिका येथील इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल माहिती असलेली सर्व कागदपत्रे त्या संस्थेला सादर केली. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीमध्ये संस्थेची फी भरून रजिस्ट्री करण्यात आली. ही रजिस्ट्री आता अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कायमस्वरूपी राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सुशील तुपे यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते सध्या शहरामध्ये एक छोटासा व्यवसाय करतात. ते सांगतात की, गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेही आकाशातील ताऱ्याला नाव देण्यात आले होते. त्यावरूनच ही संकल्पना आम्हाला सुचली आणि आपणही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेऊन एक तारा विकत घेऊयात, असे आम्ही ठरवले. आपल्याला तारा विकत घेऊन त्याला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यायचे आहे, असे ठरवल्यावर भारतामध्ये याचं रजिस्ट्रेशन होत नाही, असे आम्हाला कळले. त्यामुळे अमेरिकेतील एका संस्थेशी संपर्क साधून आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया करुन घेतली. यासाठी आम्हाला सहा महिने इतका कालावधी लागला. या अनुषंगाने आवश्यक माहिती त्यांना दिली. ही माहिती गोळा करताना आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून गोळा केली आणि काही माहितीही त्यांच्या पूर्वजांकडून गोळा करून या संस्थेकडे पाठवली आणि सहा महिन्यांनी आम्हाला या ताऱ्याला अण्णाभाऊ साठेंचे नाव देण्यामध्ये यश आले.
असा बघता येणार आकाशातील तारा
१ ऑगस्टपासून हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे. यासाठी मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेहमी ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर केलेल्या ताऱ्याचा नंबर WVP773557 टाकून बघू शकता. तसेच द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाईंडर थ्रीडी स्मार्टफोन ॲप अँड्रॉइड अँड आयफोनवरून देखील हा तारा बघता येईल, अशी माहिती सुशील तुपे यांनी दिली आहे .