केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील विविध डोंगराळ भागात मंगळवारी झालेल्या भूस्खलनामुळे अस्मानी संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 308 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 200 लोक बेपत्ता आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.तसेच आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना वाचवण्याच बचाव पथकाला यश आले आहे. मात्र 29 मुलं बेपत्ता आहेत. दरम्यान भूस्खलनग्रस्त भागात एनडीआरएफ आणि सैन्याचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा आता तीनशेच्या घरात पोहोचला आहे. एनडीआरएफचे डीजी पीयूष आनंद म्हणाले की, ‘एनडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले आहेत. आमच्या 4 टीम तेथे उपस्थित आहेत. आम्ही दोरी बचाव तंत्राचा वापर करून लोकांना वाचवले. भारतीय सैन्य आणि हवाई दलही येथे बचावकार्य करीत आहे. भारतीय लष्कर तेथे बेली ब्रिज बांधण्याचा प्रयत्न करत आहे. हवाई दलाने अनेकांची सुटका केली आहे आणि अडकलेल्या लोकांना खाद्यपदार्थांचा पुरवठाही केला आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह वायनाडमधील मेप्पडी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात पोहोचले होते. दोन्ही नेत्यांनी भूस्खलनग्रस्तांची भेट घेतली. वायनाडमध्ये 30 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 308 लोकांचा मृत्यू झाला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, ‘बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी नदीत बचावकार्य सुरूच राहील. सुटका करण्यात आलेल्या लोकांना तात्पुरते शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे.पुनर्वसनाचे काम शक्य तितक्या लवकर केले जाईल, जसे आम्ही पूर्वीच्या परिस्थितीत केले आहे.दरम्यान केरळ सरकारने माध्यमांना चित्रिकरण करणे, लोकांच्या मुलाखती घेणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण आपत्तीनंतर भारतीय लष्कराने मदत आणि बचाव कार्याची कमान हाती घेतली आहे. गुरुवारी, सैनिकांनी विक्रमी वेळेत भूस्खलनाच्या ठिकाणाजवळील नदीवरील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केले आहे. .