डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत डेमोक्रॅटिक उमेदवार बनल्या आहेत. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आणि आनंद व्यक्त केला.
डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीने शुक्रवारी जाहीर केले की, हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी पुरेशी प्रतिनिधी मते मिळवली आहेत. यामुळे हॅरिस या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी प्रमुख राजकीय तिकिटावर निवड झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला बनल्या आहेत.
1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या निवडणुकीच्या 28 तासांत कमला हॅरिस याना पक्षाच्या 2350 हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. यासह त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे.
कमला हॅरिस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून मी सन्मानित आहे. मी पुढील आठवड्यात अधिकृतपणे नामांकन स्वीकारणार आहे.”
यापूर्वीच अध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि हॅरिस यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. बायडन यांनी सोशल मीडियावर पोस्ट मध्ये म्हटले आहे की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. मी पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहण्याचा मानस होता, परंतु पक्ष आणि देशाच्या हितासाठी मी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
बायडेन यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा तसेच बिल आणि हिलरी क्लिंटन यांचा समावेश आहे.बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर 24 तासांत कमला यांचा पाठिंबा वाढल्याचे दिसून आले आहे.