Olympic Games Paris 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आता भारताची 3 पदके झाली आहेत. तिसरे पदक जिंकण्याचा पराक्रम महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने केला आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यांच्या विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली. यावेळी सर्व भारतीयांच्या ओठांवर फक्त एकच नाव आहे ते म्हणजे स्वप्नील कुसळे.
स्वप्नील हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे. धोनीने तिकीट कलेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तर स्वप्नील याने मध्य रेल्वेमध्ये टीसी म्हणून कामाला सुरुवात केली. कांस्यपदक जिंकल्यानंतर आता रेल्वेने त्याला एक मोठी भेट दिली आहे.
भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने अंतिम फेरीत ४५१.४ गुण नोंदवले होते. त्याच्या मदतीने तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि पदक जिंकण्यात यशस्वी झाला. स्वप्नील पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता आणि त्यात त्याने पहिले पदक जिंकले. त्याचे यश पाहून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी स्वप्नीलला अधिकारी करण्याची घोषणा केली. देश आणि रेल्वेचा गौरव केल्यामुळे त्याला टीसी पदावरून बढती देऊन ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ म्हणजेच ओएसडी करण्यात येणार आहे.
ही मध्य रेल्वे आणि त्यांच्या विभागासाठी अभिमानाची बाब असल्याचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सांगितले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर स्वप्नीलने विजयानंतर रेल्वेचे कौतुक केले आहे. रेल्वेच्या कामासाठी जात नसल्याचा खुलासा त्याने यावेळी केला. त्याला देशासाठी चांगली कामगिरी करता यावी यासाठी भारतीय रेल्वेने त्याला ३६५ दिवसांची सुट्टी दिली आहे.
महाराष्ट्र्र सरकारकडून 1 कोटीचे बक्षीस
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन करून स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भविष्यात सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिले आहे. एवढेच नाही तर एक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.