Pune Rain : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून संध्याकाळी ५.०० वाजता ४५ हजार क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
पुण्यात रविवारी सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील सिंहगड रोड परिसरातील एकतानगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचले आहे. सोसायट्यांमधील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात अतिमुसळधार पावसामुळे धरण भरु लागले आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहे.
खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाल्यास नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही. नागरिकांना ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमाद्वारे खबरदारी घेण्याच्या सूचना व वेळोवेळी पुरपरिस्थितीची माहिती द्यावी असा आदेश अजित पवारांनी दिला आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पुण्यात देखील गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून नदीपत्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहेत, तसेच नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वेळी झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनही अलर्ट झाले आहे.