Bangladesh Protest : बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. आंदोलक हिंदूंना लक्ष्य करत आहेत. रविवारी झालेल्या भीषण चकमकीत 14 पोलिसांसह 100 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण जखमी झाले आहेत.
या आंदोलनात कट्टरवाद्यांनी हिंदूंना लक्ष केले असून मंदिरांवर हल्ले केले जात आहेत. या आंदोलनात इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारात एका हिंदूचाही मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. भारताने लोकांना प्रवास टाळण्यास सांगितले. सध्या बांगलादेशमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले आहे, संपूर्ण देशात कर्फ्यू लागू आहे.
बांगलादेशात आरक्षणाबाबत आंदोलन केले जात आहे, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक सरकारकडे राजीनाम्याची मागणी करत आहेत.
बांगलादेशात आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटले असून, रविवारी संध्याकाळपासून देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांचे वक्तव्य
बांगलादेशात निषेधाच्या नावाखाली तोडफोड केली जात असल्याचे पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले. असे करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशी तीन दिवसांची सुट्टीही सरकारने जाहीर केली आहे.