महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई,नाशिक, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागात अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. गंगापूर धरणातून पाण्याच विसर्ग वाढल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील पाणी शिरलेले पाहायला मिळाले. नाशिकच्या सात धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान गिरणा नदीत मासेमारीसाठी गेलेले काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.
१० ते १५ जण रविवारी गिरणा नदीत मासेमारीसाठी गेले होते. मात्र मुसळधार पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेले मच्छिमार नदीतील एका लहानशा टेकडीवर अडकून पडले होते. १० ते १५ तासांपासून अडकलेल्या या लोकांना अखेर लष्कराच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने या सर्वाना सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे.