दिल्लीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोचिंग संस्थांची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, दिल्ली सरकार आणि दिल्ली महापालिकेला नोटीस बजावली आहे.काही दिवसांपूर्वी दिल्ली कोचिंग सेंटरमध्ये पुराचे पाणी आल्याने आयएएसची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
दिल्लीतील कोचिंग सेंटर्स डेथ चेंबर बनले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ते लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. आम्ही ही कोचिंग सेंटर्स बंद करू शकतो आणि जोपर्यंत ते आग आणि इतर सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत तोपर्यंत त्यांना ऑनलाइन मोडद्वारे काम करण्याची परवानगी देऊ शकतो. राजेंद्र नगरच्या कोचिंग सेंटरमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा संदर्भ देत न्यायालयाने कोचिंग सेंटरमधील सुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात असलेल्या लायब्ररीत अचानक आलेल्या पुरात यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा अडकून मृत्यू झाला. या वेदनादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जुन्या राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना चांगलेच फटकारले. याशिवाय या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांना फटकारताना न्यायालयाने म्हटले की, नशीब की तुम्ही बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने पाण्याला दंड लावला नाही. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.