बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपला ढाका राजवाडा सोडला असून त्या सुरक्षित स्थळी रवाना झाल्या असल्याची समोर आली आहे. बांगला देशातील वाढत्या अशांतता आणि त्यांच्या प्रशासनावरील वाढत्या दबावादरम्यान हे पाऊल पुढे आले आहे.
शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.बांगलादेश सोडत त्या आगारताला इथे पोचल्याचे सांगितले जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणावरुन वाद चिघळला आहे. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.
बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते.सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.