युपीएससीने वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा २०२२ मधील उमेदवारी रद्द केली असून त्यांना भविष्यातील सर्व युपीएससी परीक्षांमधून कायमचे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर यांनी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. मात्र युपीएससीच्या या निर्णयाविरोधात पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
युपीएससीने १८ जुलै २०२४ रोजी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यांना २५ जुलैपर्यंत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र त्यांनी अधिक वेळ वाढवून देण्याची विनंती केली. युपीएससीने त्यांची विनंती मान्य करून ३० जुलै २०२४ पर्यंत वेळ दिली होती, परंतु त्यांनी विहित वेळेत उत्तर सादर केले नाही. त्यामुळे युपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली.
युपीएससीने २००९ ते २०२३ या दरम्यानच्या १५,००० हून अधिक शिफारस केलेल्या उमेदवारांच्या डेटाची तपासणी केली. त्यात पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांनी युपीएससी नियमांनुसार परवानगीपेक्षा जास्त प्रयत्नांचा लाभ घेतल्याचेही स्पष्ट झाले. त्यांच्या प्रकरणात नियमावली लागू करता आले नाही, कारण त्यांनी नाव व पालकांचे नाव बदलले होते.
युपीएससीने स्पष्ट केले की, त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची फक्त प्राथमिक छाननी केली. सखोल तपासण्याचे आदेश किंवा साधने युपीएससीकडे नाहीत. त्यामुळे प्रमाणपत्रावर शंका निर्माण झाल्यास सक्षम प्राधिकरणाने ते सत्य असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात खोटे प्रमाणपत्र वापरल्याचे आरोप असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, युपीएससीने नियमावली अधिक मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत.
पूजा खेडकर हिने नावात चुकीच्या आणि गैरमार्गाने फेरफार करत तब्बल सात वेळा यूपीएससीची परीक्षा दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. . त्यांनी इंग्रजी भाषेमधून नाव देताना त्यांच्या नावाचे स्पेलिंग देखील बदलले. या प्रकरणी दिल्ली पोलिस तपास करत असून यात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देताना वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केला आहे. तसेच आई वडिलांचा खोटा घटस्फोट देखील दाखवल्याचे समोर आले आहे.
मात्र दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पूजा खेडकर यांनी युपीएससीच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. आता कोर्टाचा निर्णय काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.