Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असतील. यावेळी ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे यांचा हा पहिलाच राष्ट्रीय राजधानीचा दौरा असेल, असे राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अदित्य ठाकरे हेही दिल्लीला जात आहेत.
या दौऱ्यात उद्धव ठाकरे तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टीचे नेते त्यांची भेट घेणार आहेत. तसेच काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे राजधानीत मराठी आणि राष्ट्रीय पत्रकारांचीही भेट घेणार आहेत.
या लोकांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरे मंगळवारी रमेश चेन्निथला यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात अनेक पातळ्यांवर राजकीय चर्चा आणि बैठका होणार आहेत. याशिवाय ते महाराष्ट्रातील अनेक खासदारांनाही भेटणार आहेत. उद्धव ठाकरेंची ही दिल्ली भेट म्हणजे एक प्रकारे राजकीय संवाद भेट आहे. असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.