Bangladesh Government Crisis : रविवार पासून बांगलादेशमधले आंदोलन चांगंलेच तापले आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आज आंदोलक ढाका येथील पंतप्रधानांच्या निवास्थानी घुसून तोडफोन करत आहेत. यादरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. देश सोडल्यानंतर त्या भारतात आश्रय घेणार असल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांपासून सुरू झालेली चळवळ इतकी कशी वाढली की शेख हसीना यांना बांगलादेश सोडावे लागले? याची 5 मोठी कारणे जाणून घेणार आहोत.
1. आरक्षणाबाबत आंदोलन
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. काही वेळातच या निदर्शनाला हिंसक वळण आले. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या ३० टक्के आरक्षणाचा वाद आहे. गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
2. विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध
आरक्षणाबाबत बांगलादेशात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विरोधी पक्षही आघाडीवर आले. शेख हसीना सरकारच्या विरोधात विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने लाखोंचा जनसमुदाय जमवला आणि शेख हसीना यांची खुर्ची हलवली. विरोधकांनी हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारला विरोधाचा सामना करण्यातही अपयश आले.
3. लष्कराने पाठिंबा दिला नाही
बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये लष्करानेही सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला. हिंसक आंदोलनात 90 जणांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर बांगलादेश लष्कराने सांगितले की, आता ते आंदोलकांवर गोळीबार करणार नाहीत. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी लष्कराच्या मुख्यालयात परिस्थितीवर चर्चा केली आणि घोषणा केली की आता आंदोलकांवर एकही गोळी चालवली जाणार नाही.
4. हिंसाचार भडकावण्यात पाकिस्तानचा हात
बांगलादेशात हिंसाचार भडकावण्यात पाकिस्तानचाही हात आहे. बांगलादेशच्या नागरी समाजाने पाकिस्तान उच्चायुक्तालयावर कट्टरपंथी विद्यार्थी निदर्शकांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन पाकिस्तान बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या ‘मिशन पाकिस्तान’ जमातशी संबंधित विद्यार्थी आंदोलकांच्या एका भागाशी पाकिस्तान संपर्कात असल्याचे काही अहवालातून समोर आले आहे.
5. बांगलादेशची आर्थिक परिस्थिती बिकट
बांगलादेशची आर्थिक स्थिती आधीच बिकट होती, पण या आंदोलनाने त्याला आणखी धक्का बसला. तेथे बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना दीर्घकाळ सत्तेवर आहेत. अलीकडेच त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या, तेव्हा बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.