बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपला ढाका राजवाडा सोडला असून त्या सुरक्षित स्थळी रवाना झाल्या असल्याची समोर आली आहे. बांगला देशातील वाढत्या अशांतता आणि त्यांच्या प्रशासनावरील वाढत्या दबावादरम्यान हे पाऊल पुढे आले आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.बांगलादेश सोडत त्या आगारताला इथे पोचल्याचे सांगितले जात आहे.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी प्रथमच देशातील नागरिकांना संबोधित केले. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी जाहीर केले की, ”आता अंतरिम सरकार स्थापन होईल, लष्करावर विश्वास ठेवा.” दरम्यान, मोठ्या संख्येने आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी देशाला संबोधित करताना सांगितले की ”पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. देशात शांतता आणि सुव्यवस्था राखा. चला एकत्र काम करूया. लढून काही मिळणार नाही. आम्ही मिळून बांगलादेशला एक सुंदर देश बनवले आहे. सर्व राजकीय पक्षांशी अर्थपूर्ण चर्चा करून आम्ही अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे लष्करप्रमुख जमान यांनी सांगितले. परिस्थिती सोडवण्यासाठी आम्ही आता अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याशी चर्चा करू. त्यांनी सर्वांना निषेधाच्या नावाखाली हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले आणि नवीन सरकार भेदभाव विरोधी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या सर्व मृत्यूंना न्याय मिळवून देईल असे आश्वासन दिले.”