Bangladesh Government Crisis : शेजारचा देश बांगलादेशाची कमान लष्कराने हाती घेतली आहे. लष्कराने देशात सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-जमान हे आता देशाचे निर्णय घेतील. वकार-उझ-जमान यांचा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सोबत खास संबंध आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशची कमान लष्कराच्या हाती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-जमान हे शेख हसीना यांचे मेहुणे आहेत. वकार-उझ-जमान यांची पत्नी शेख हसीना यांच्या काकांची मुलगी आहे. जनरल वकार यांचे सासरे आणि शेख हसीना यांचे काका मुस्तफिझूर रहमान आहेत, त्यांनी 24 डिसेंबर 1997 ते 23 डिसेंबर 2000 पर्यंत बांगलादेश लष्कराचे लष्करप्रमुख म्हणून काम केले होते.
यावर्षी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी जून 2024 मध्ये देशाच्या संरक्षण दलाचे नेतृत्व स्वीकारले. डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून डिफेन्स स्टडीजमध्ये एमएची पदवी मिळवली.
लष्करप्रमुख वकार-उझ-झमान कुठे काम करायचे?
लष्कराच्या वेबसाइटनुसार, जनरल वकार यांनी पायदळ बटालियन, बीडी, लष्कराची एकमेव स्वतंत्र पायदळ ब्रिगेड आणि पायदळ विभागाची कमांड दिली. साडेतीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी शेख हसीना यांच्यासोबतही जवळून काम केले आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत सशस्त्र दल विभागात मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
दरम्यान, जनरल वकार उझ झमान यांनी बांगलादेशची सत्ता आपल्या हातात घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याची संपूर्ण जबाबदारी आपण घेणार असल्याचे सांगितले. आंदोलकांच्या सर्व मागण्या सेना पूर्ण करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, शेख हसीना दिल्लीत पोहोचल्या आहेत. काही काळ त्या भारतात राहणार असून येथून त्या लंडनला जाऊ शकतात.