Bangladesh Government Crisis : बांगलादेशातील आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र समोर आले आहे. देशभरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील बिकट परिस्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी बांगलादेश सोडला आहे, आणि भारतात दाखल झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतरही देशातील आंदोलन थांबले नाही, उलट आणखीच हिंसाचार वाढत चालला आहे. अशातच काल आंदोलकांनी एका हॉटेलला आग लावण्याची घटना समोर आली.
बांगलादेशातील जेसोरमध्ये सोमवारी आंदोलकांकडून एका हॉटेलला आग लावण्यात आली, ज्यात किमान 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 84 जण जखमी झाले आहेत. हॉटेलचे मालक जेसोर जिल्ह्यातील अवामी लीगचे सरचिटणीस शाहीन चकलादार होते. हे हॉटेल शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्याचे असल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू
बांगलादेशात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे आतापर्यंत 300 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तथापि, मृत्यूच्या आकड्यांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती नाही, मात्र मृत्यूची संख्या 300 च्या वर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.