Indian Hockey Team : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाला जर्मनीविरुद्ध 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. जर्मनीच्या मार्को मिल्कोने अखेरच्या मिनिटाला गोल करत टीम इंडियाकडून विजय हिसकावून घेतला. एकवेळ 2-2 अशी बरोबरी होती. मात्र मिल्कोच्या गोलमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. आणि टीम इंडियाचे गोल्ड जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. आता टीम इंडिया कांस्यपदकासाठी मैदानात उतरेल. यावेळी भारतीय हॉकी संघ स्पॅनिश संघाशी मुकाबला करेल.
सामन्याच्या सुरुवातीला भारताला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र भारतीय संघाला यश मिळू शकले नाही. यानंतर सातव्या मिनिटाला भारतीय कर्णधार हरमप्रीत सिंगने कोणतीही चूक न करता पेनल्टी कॉर्नरवरून दमदार शैलीत गोल केला. त्यानंतर भारतीय हॉकी संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 अशी आघाडी कायम ठेवली.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला गोन्झालो पेलेटने गोल करून सामन्यात स्कोअर 1-1 असा केला. गोन्झालोने 18व्या मिनिटाला गोल करून संघाला बरोबरी मिळवून दिली. यानंतर काही वेळातच 27व्या मिनिटाला क्रिस्टोफर रुडने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. यासह जर्मनीने सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. दुसरा डाव पूर्णपणे जर्मनीच्या नावावर होता. भारतीय खेळाडूंनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र गोल होऊ शकला नाही.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय हॉकी संघाने आक्रमक खेळ करत जर्मन विरुद्ध गोल सातत्याने प्रयत्न केला. सर्व खेळाडू एकजुटीने खेळले. यानंतर 36व्या मिनिटाला सुखजित सिंगने गोल करून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने जर्मन संघावर वर्चस्व राखले आणि विरोधी संघाला एकही संधी दिली नाही.
तर चौथ्या क्वार्टर जर्मनीसाठी मार्को मिल्कोने ५४व्या मिनिटाला गोल केला. यामुळे पुन्हा एकदा आघाडी जर्मनीकडे गेली आणि जर्मनीने हा सामना 3-2 असा जिंकला.