Uddhav Thackeray reaction on Bangladesh : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये दाखल होताच त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी बांगलादेशमधील परिस्थितीवरही भाष्य केले. बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले, अमित शाह आणि पीएम मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत ते बांगलादेशला जाणार असतील तर त्यांनी जावं आणि ज्या पद्धतीने रशिया- युक्रेन युद्ध थांबवले म्हणत होते, त्या पद्धतीने बांगलादेश युद्ध सुद्धा थांबवावे अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली. बांगलादेशमध्ये आज जे काही घडत आहे ती सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी म्हंटल आहे.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आज पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेमध्ये जी स्थिती झाली आहे यावरून एकच लक्षात येते की जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. इस्त्रायलमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधानांना घरातून बाहेर पडणे अशक्य झाले होते. ते पुढे म्हणाले की अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये. बांगलादेशमध्ये आज जे काही घडले आहे तो इशारा आपल्या सर्वांसाठी असून जनतेचे न्यायालय सर्वोच्च असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठे मानू नये, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत देवानेच मला पाठवल्याचे वक्तव्य केले होते.
बांगलादेशातील पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. काही वेळातच या निदर्शनाला हिंसक वळण आले. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या 30 टक्के आरक्षणाचा हा वाद आहे. गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यामुळे देशातील लोक रस्त्यावर उतरले आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आरक्षणाबाबतचे आंदोलन इतके पेटले की पंतप्रधानांना राजीनामा देत देश सोडावा लागला.