न्यूयॉर्क शहरात एका पाकिस्तानी नागरिकाला पकडण्यात आले आहे. हा नागरिक अमेरिकी नेत्यांची हत्या करण्यासाठी आला होता अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या व्यक्तीचे इराण सरकारशीही संबंध आहेत. न्यायालयीन कागदपत्रांनुसार न्याय विभागाने या व्यक्तीवर राजकीय हत्या करण्यासाठी कट रचणे आणि इराण सरकारशी संबंधांचे आरोप ठेवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी व्यक्तीला अटक केल्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य अमेरिकी नेते, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तक्रारीत मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नाही. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या निशाण्यावर अन्य नेत्यांसह डोनाल्ड ट्रम्प देखील होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका निवडणूक रॅलीत भाषण करत असताना ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. यात ट्रम्प थोडक्यात बचावले होते. त्यांच्या कानाला गोळी लागली होती.
या घटनेनंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर करण्यात आली होती. आता पुन्हा ट्रम्प यांच्यासह अन्य नेत्यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील ब्रुकलिन येथील एका तक्रारीनुसार पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीचे नाव असिफ मर्चंट आहे. त्याला असिफ रजा मर्चंट या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तीवर पैसे घेऊन अमेरिकी नेते किंवा अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
एफबीआयने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मोठा कट सफल होण्याआधीच या व्यक्तीला पकडण्यात आले. या व्यक्तीला सध्या न्यूयॉर्कमध्ये अटकेत ठेवण्यात आले आहे.
असिफ रजाने हत्या करण्यासाठी ज्या लोकांना नियुक्त केले होते ते एफबीआयचे एजंट होते. एफबीआय न्यूयॉर्क फील्ड ऑफिस कार्यवाहक सहायक निदेशक क्रिस्टी कार्टिस यांनी सांगितले की ज्या लोकांना असिफ रजाने हत्या करण्यासाठी नियुक्त केले होते ते सगळे एफबीआयचे गुप्त एजंट होते. ही सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल. यामुळे मोठ्या कटाचा उलगडा आम्हाला करता आला.
दरम्यान, अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी सध्या सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प उमेदवार आहेत. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या जागी कमला हॅरिस उमेदवार असण्याची शक्यता आहे. या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच अमेरिकी नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हमास दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला आपल्या देशात पाहुणा म्हणून बोलवून राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभात सन्मान दिला होता. या प्रमुखाला इस्रायलने ठार केले होते. आपल्या देशात घुसून मारले म्हणून इराण खवळला आहे. याच इराणने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य राजकीय नेत्यांच्या हत्याचे कट रचल्याचे उघड झाले आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने या इराणी प्लॅनचा खुलासा केला आहे. एका पाकिस्तानी नागरिकाला इराणने यासाठी काम दिले होते. आसिफ रजा मर्चंट असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर राजनैतिक हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ट्रम्प आणि माजी अमेरिकी अधिकाऱ्यांना मारण्याचा इराणचा प्लॅन होता.
ब्रुकलीनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला या हत्या केल्या जाणार होत्या. यासाठी त्याला न्यूयॉर्क शहराचा दौरा करणे आणि एका शूटरसोबत काम करण्यास सांगण्यात आले होते. पाकिस्तान आणि मुस्लिम जगताला नुकसान पोहोचविणाऱ्या लोकांना संपविण्याचे काम देण्यात आले होते, असे मर्चंटने म्हटले आहे.
मर्चंटला १२ जुलैला अटक करण्यात आली आहे. तो सर्व प्लॅनिंग करून अमेरिका सोडण्याची तयारी करत होता. त्याने शूटर शोधले होते जे अमेरिकेचेच गुप्तहेर निघाले आणि इराणचा सगळा प्लॅन उघडा पडला. रेकी करण्यासाठी एक महिला आणि हत्येनंतर पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी २५ लोक त्याला हवे होते.