Himachal Pradesh : मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, भूस्खलनामुळे 109 रस्ते बंद करण्यात आले आहेत.
हवामान खात्याने 10 ऑगस्ट रोजी राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस, गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच हवामान खात्याने येत्या २४ तासांत कांगडा, सिरमौर, चंबा, शिमला, कुल्लू, किन्नौर, सोलन आणि मंडी जिल्ह्यांच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पुराचा इशारा दिला आहे.
भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची भीती
स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या म्हणण्यानुसार, मंडीतील 37, शिमल्यात 29, कुल्लूमधील 26, कांगडामधील सहा, किन्नौर आणि लाहौल-स्पीतीमध्ये प्रत्येकी चार, सिरमौरमधील दोन आणि हमीरपूरमधील एक अशा एकूण 109 रस्ते बंद आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांत आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. जोरदार वारा आणि सखल भागात पाणी साचल्याने बागा, पिके, कमकुवत बांधकामे आणि कच्चा घरांचे नुकसान होण्याची भीतीही विभागाने व्यक्त केली आहे.
ढगफुटीमुळे आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू
शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांमध्ये 31 जुलैच्या मध्यरात्री ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. ढगफुटीत रामपूर उपविभागातील सरपारा पंचायत अंतर्गत समेज गावाला सर्वाधिक फटका बसला आहे. येथील सुमारे 25 लोक बेपत्ता आहेत.
मंडीच्या राजभान गावातून 9 जणांचा मृतदेह सापडला
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंडीतील राजभान गावात नऊ मृतदेह, कुल्लू जिल्ह्यातील निरमंद आणि बागीपुल येथून तीन मृतदेह सापडले आणि शिमला जिल्ह्यातील धडकोल, ब्रो आणि सुन्नी धरणाच्या आसपासच्या भागातून 10 मृतदेह सापडले. पोलिसांनी सांगितले की, एकूण 22 मृतदेहांपैकी 6 मृतदेह बुधवारी बाहेर काढण्यात आले. यातील चार मृतदेह शिमल्यात आणि दोन मृतदेह कुल्लूमध्ये सापडले आहेत. आतापर्यंत 12 मृतदेहांची ओळख पटली असून उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही शोध मोहीम सुरू आहे.