भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजीमध्ये त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण करून न्यूझीलंडला पोहोचल्या आहेत. त्यांनी येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेला संबोधित करून संपूर्ण जगाला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्य, “शिक्षण नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. शिक्षणाची परिवर्तनीय शक्ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. 21 व्या शतकातील भारतामध्ये शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणाने विविध क्षेत्रातील नेते दिले आहेत जे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरात योगदान देत आहेत.”
पुढे बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या, “आज भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहीत आहे. भारतीय पालक देखील आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याची आकांक्षा बाळगतात. हे खरोखर स्वागतार्ह आहे. आज आठ हजार भारतीय विद्यार्थी न्यूझीलंडमधील विविध संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण घेत आहेत.”
तत्पूर्वी, न्यूझीलंडला पोहोचलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांनी शासकीय निवासस्थानी जोरदार स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मूच्या स्वागतासाठी पारंपारिक माओरी “पोविरी” समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांना रॉयल गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. गव्हर्नर-जनरल डेम सिंडी किरो यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गव्हर्नर जनरल किरो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील उबदार आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे कौतुक केले आणि विविध क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली.