Muhammad Yunus : नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात आज अंतरिम सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अशा परिस्थिती पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
मोहम्मद युनूस यांना सरकार स्थापनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली होती. सुरुवातीला त्यांनी ते मान्य केले नाही पण खूप चर्चेनंतर त्यांनी होकार दिला. पदाची शपत घेण्यापूर्वी मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
मोहम्मद युनूस पॅरिसहून गलादेशात पोहोचले आहेत. पॅरिस सोडताना मोहम्मद युनूस म्हणाले होते की, ते देशात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील आणि परिस्थिती कशी हाताळता येईल हे पाहतीन.
मोहम्मद युनूस परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतील का?
शेख हसीना दीर्घकाळ बांगलादेशच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिल्या. त्यांनी देश सोडल्यानंतर परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल हे सांगणे कोणालाही सोपे नाही. बांगलादेशातील राजकीय भूमिका काय असेल? मोहम्मद युनूसबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय असेल? ही स्थितीही अद्याप स्पष्ट झालेली नाही.
खरं सांगायचे झाले तर बांगलादेशच्या राजकारणात आता दोन मोठे पक्ष दिसत आहेत. एक बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) म्हणजे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष आणि दुसरा जमात-ए-इस्लामी. यापूर्वीही हे दोन्ही पक्ष युती म्हणून सरकारमध्ये होते.
अशा स्थितीत आगामी निवडणुकीत किंवा सरकार स्थापनेबाबत त्यांची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न असणार आहे. परिस्थिती बदलण्यासाठी लष्कर मोहम्मद युनूस यांच्याशी चर्चा करत आहे. लष्करप्रमुख म्हणाले, “मी प्रोफेसर युनूस यांच्याशी बोललो आहे. मला वाटले की ते हे काम करण्यास उत्सुक आहेत आणि मला खात्री आहे की ते आम्हाला चांगल्या लोकशाही प्रक्रियेकडे नेण्यात यशस्वी होतील आणि आम्हाला त्याचा फायदा होईल.”