महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा नांदेडमध्ये अपघात झाला. नांदेड शहरातील आसना बायपास परिसरात गाडी दुभाजकाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उतरली, परंतु सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. गाडीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सुरक्षित आहेत, परंतु फॉर्च्यूनर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षांचे महाराष्ट्र दौरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये नांदेडच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तटकरे यांनी “लाडकी बहीण” योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. . या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार आदी उपस्थिती होती.यानंतर आदिती तटकरे यांचा ताफा भोकरचा कार्यक्रम आटोपून नांदेड विमानतळाकडे येत असताना हा अपघात झाला.
महिला मेळाव्यामध्ये अदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेचा पहिला हप्ता १६ किंवा १७ ऑगस्टला मिळेल.मुख्यमंत्री “लाडकी बहीण” योजनेसाठी १ कोटी ४० लाख अर्ज आले असून, त्यापैकी १ कोटी २५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सन्मान निधी महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होईल, त्यामुळे महिलांमध्ये आनंद आहे. तसेच तटकरे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना खटकतो, म्हणूनच ते टीका करत आहेत.