Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून राज्यात अनेक योजना आणल्या जात आहेत. नुकतीच राज्यात लाडकी बहीण योजना राबवली जात असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणखी एका योजनेची घोषणेची केली आहे. आम्ही लाडक्या भावासाठी देखील योजना आणली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला. अजित पवार दिंडोरी येथे जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीजबिल भरावं लागणार नाही. तसेच आतापर्यंत थकबाकी असलेले बिल भरण्याची गरज नाही. जर कनेक्शन कापण्यासाठी कोणी आले तर त्याला सांगा अजितदादाने सांगितलंय, असं अजित पवार म्हणालेत.
राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सौरउर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करुन आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे, असा दावा देखील अजित पवारांनी यावेळी केलाय.
लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू
दरम्यान, नुकतीच आणलेली लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील, असेही ते म्हणाले आहेत. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी जोरदार टीका केल्या होत्या, तसेच ही योजना लवकरच बंद पडेल असा दावाही विरोधकांडून करण्यात आला होता. अशातच आता अजित पवारांनी ही योजना पाच वर्ष सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.