सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान या अधिवेशनात वक्फ बोर्डाबाबत सुधारणा दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले. यावर काँग्रेसने आक्षेप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या वतीने केसी वेणुगोपाल यांनी यावर आक्षेप व्यक्त करत हा धर्म आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. जेडीयूने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या बिलावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा आणि अखिलेश यादव यांच्या जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
अखिलेश यादव या बिलावर बोलत असताना अमित शहा यांनी उठून तुम्ही यावर गोलगोल बोलू शकत नाही असे सांगितले. या विधेयकाला विरोध करताना अखिलेश यादव म्हणाले, “हे सुनियोजित राजकारणाचा भाग म्हणून होत आहे. जर तुम्ही सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, तर तुम्हाला माहीत आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी एके ठिकाणी असे काय केले की येणाऱ्या पिढ्यांनाही त्रास होईल.सर, मी ऐकले आहे की तुमचे काही हक्क हिरावून घेतले जात आहेत, त्यामुळे आम्हाला तुमच्यासाठीही लढावे लागेल.” अखिलेश यादव यांचे भाषण ऐकून अमित शहा यांनी त्यांना अडवले आणि म्हणाले, “स्पीकर महोदय अखिलेश यादव हे सर्वोच्च स्थानाचा अपमान करत आहेत.
वास्तविक, केंद्र सरकारने वक्फ कायदा, 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक, 2024 सादर केले आहे. राज्य वक्फ बोर्डाचे अधिकार, वक्फ मालमत्तेची नोंदणी, सर्वेक्षण आणि अतिक्रमण हटवण्याशी संबंधित समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी वक्फ विधेयकावर आक्षेप घेत म्हटले की, ”आम्ही हिंदू आहोत पण त्याच वेळी आम्ही इतर धर्मीयांच्या श्रद्धेचाही आदर करतो. हे विधेयक महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीसाठी खास आहे. गेल्या वेळी भारतातील जनतेने तुम्हाला स्पष्टपणे धडा शिकवला हे तुम्हाला समजत नाही. हा संघराज्य व्यवस्थेवरचा हल्ला आहे.”