कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली. आगीच्या प्रचंड ज्वालांनी नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.केशवराव भोसले नाट्यगृह हे वारसा हक्क स्थळापैकी एक आहे. अलीकडेच वारसा स्थळाला अनुसरून या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. हे केशवराव भोसले नाट्यगृह बहुतांश लाकडापासून बांधले असल्याने आगीने लगेच रौद्ररुप धारण केल्याचे दिसून आले .
केशवराव भोसले नाट्यगृहाला लागून असलेले ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान ,देवल क्लब संगीत मंडळ आणि यादरम्यान असलेली खाऊ गल्ली यामुळे येथे रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. ही आग लागल्यानंतर तातडीने महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. त्यांच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आग मोठी असल्याने ती विजवण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र सध्या मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून छतही कोसळले आहे.या आगीत नाट्यगृहाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती.आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे.मात्र या दिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांतून आणि नाट्यकलावंतांमधून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.तसेच ही आग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लागली असल्याचा आरोप करून आगीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये अनावश्यक बदल करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आता कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे.