फ्रान्सच्या पॅरीस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नीरजचे अभिनंदन केले आहे. यासोबतच नीरजच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याचे दिसून आले.
यासंदर्भातील एक्स संदेशात पंतप्रधान मोदी म्हणतात की, “नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे खरे उदाहरण आहेत. त्यांनी आपली प्रतिभा वेळोवेळी दाखवली आहे. नीरज पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाल्याचा देशाला आनंद आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुढील अनेकांसाठी एक उत्तम उदाहरण त्यांनी निर्माण केले आहे. बाकीच्या खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाचा अभिमान वाढवण्यासाठी नीरज चोप्रा यांची ही कामगिरी प्रेरणा देत राहील. असे मोदींनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या संदेशात म्हणाले की, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल आणि रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे असामान्य ॲथलीटचे खूप अभिनंदन. तो कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्य यांचे प्रतीक आहे. त्याच्या यशासाठी संपूर्ण देश आनंदी आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला की, स्पर्धा शानदार होती. प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा दिवस असतो, आज पाकिस्तानी खेळाडू अर्शदचा दिवस होता. टोकियो, बुडापेस्ट, आशियाई खेळांचा स्वतःचा दिवस होता..मी माझे सर्वोत्तम दिले, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या यावर लक्ष देण्याची आणि काम करण्याची गरज आहे. आपले राष्ट्रगीत आज वाजवले जाणार नाही, पण भविष्यात ते नक्कीच वाजवले जाईल असा विश्वास नीरजने व्यक्त केला आहे.
.नीरजच्या या यशाचा आनंद त्याच्या पानिपत येथील घरी साजरा केला जात आहे. घरातील कुटुंबीय खूप आनंदी असल्याचे त्याची आई सरोज देवी यांनी सांगितले. आमच्यासाठी रौप्यपदकही सुवर्णपदकासारखेच असल्याचे सरोज देवी म्हणाल्या आहेत . तर प्रत्येकाचा स्वतःचा दिवस असतो. आज पाकिस्तानचा खेळाडू अर्शदचा दिवस होता, त्याने सुवर्णपदक जिंकले. मात्र आपण दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत पदक जिंकले, ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे नीरजचे वडील सतीश चोप्रा यांनी सांगितले.