१५ ऑगस्ट रोजी आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने हर घर तिरंगा या अभियानाची सुरूवात केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आजपासून घरोघरी तिरंगा मोहीम सुरू झाली. ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या मोहिमेच्या महत्त्वाचा एक भाग म्हणून 13 ऑगस्ट रोजी देशाची राजधानी दिल्लीत खासदारांची तिरंगा बाइक रॅली काढण्यात येणार आहे.
‘हर घर तिरंगा अभियाना’च्या शुभारंभाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेची सविस्तर माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) प्रसिद्ध केली आहे. नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची भावना निर्माण करणे हा यामागचा उद्देश असल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे. त्यांनी नागरिकांना त्यांच्या घरी तिरंगा फडकावा आणि ध्वजासह सेल्फी क्लिक करून harghartiranga.com वर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.
शेखावत म्हणाले, ही मोहीम २०२२ मध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 23 कोटींहून अधिक घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि 6 कोटी लोकांनी harghartiranga.com वर ध्वजासह त्यांचे सेल्फी अपलोड केले. 2023 मध्ये हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत 10 कोटींहून अधिक सेल्फी अपलोड करण्यात आले.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या मोहिमेत सहभागी होत आहेत. प्रमुख उद्योग भागीदार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, रेल्वे, नागरी विमान वाहतूक क्षेत्र, भारतीय सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) देखील माहिती प्रसारित करण्यात आणि मोहिमेचा प्रचार करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत. देशभरातील स्वयं-सहायता गट मोठ्या प्रमाणावर ध्वज निर्मिती आणि उपलब्धतेसाठी सक्रियपणे योगदान देत आहेत.