स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी ISIS मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान अली खान असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो दर्यागंजचा रहिवासी आहे. माहिती देताना दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त सीपी प्रमोद कुशवाह म्हणाले की, दहशतवादी एनआयए प्रकरणातील आरोपी होता आणि 2 वर्षांपासून फरार होता.
हा दहशतवादी ISIS चा भाग मानल्या जाणाऱ्या शाहनवाज मॉड्यूलचा आहे. तो पाकिस्तानी सुरक्षा एजन्सी आयएसआयसाठीही काम करतो. दोन वर्षांपूर्वी शाहनवाज मॉड्यूल देशात दहशतवादी घटनांचा कट रचत होता. त्यानंतर याप्रकरणी पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, त्याआधारे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी इम्रान आणि इतर काही दहशतवाद्यांना पकडले होते. त्यादरम्यान रिझवान पळून गेला होता.