राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची (मविआ) जबाबदारी उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या (उबाठा) सूत्रांनी दिली. ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले आहे .
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यांनी आज, गुरुवारी ठाकरे आणि सोनिया गांधी यांची बैठक झाली. या दोन्ही बैठकांमध्ये राज्यात मविआची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात लढवणे फायदेशीर ठरेल, असे काँग्रेसला वाटते. याचा फायदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीतही झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये आघाडीतील सर्व पक्षांनी एका सुरात काम करायचे ठरले. काँग्रेसने उद्धव ठाकरेंना नेतृत्व देण्यास सहमती दर्शवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची सुमारे एक तास भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालय बार असोशिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांचीही भेट घेतली. या भेटीत शिवसेना पक्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांवर चर्चा झाली.
दरम्यान दुसरीकडे भाजप दोन्ही शिवसेना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेनेने एकत्र यावे आणि एनडीएचा भाग व्हावे, अशी भाजपची इच्छा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातोय. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय बलिदान देण्यास भाजप तयार आहे. सध्या तरी उद्धव ठाकरेंकडून संमती मिळालेली नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपले दरवाजे पूर्णपणे बंद केले नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.