PM Modi : अनेक दिवसांच्या अशांतता आणि राजकीय गोंधळानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी गुरुवारी देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतर मुहम्मद युनूस यांचे अभिनंदन केले असून बांगलादेशातील हिंदूंसह सर्व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मुहम्मद युनूस याचे अभिनंदन करत लिहिले की, ‘मुहम्मद युनूस यांना त्यांच्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्याबद्दल माझ्या शुभेच्छा. आम्ही हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करून सामान्य स्थितीत लवकर परत येण्याची अपेक्षा करतो. शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी दोन्ही देशांतील लोकांच्या सामायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत बांगलादेशसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे.
राहुल गांधींनीही केले अभिनंदन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुहम्मद युनूस यांचे अभिनंदन केले आणि देशात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो पोस्ट करत राहुल म्हणाले, ‘प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुढे लिहिले, ‘शांतता आणि सामान्यता त्वरित पुनर्संचयित करणे ही काळाची गरज आहे.’
शेख हसीना यांचा राजीनामा
शेजारील देशात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला होता. या घटनेनंतर तीन दिवसांनी युनूस यांनी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे देशात नव्याने निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
84 वर्षीय अर्थशास्त्रज्ञ युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून विद्यार्थी आंदोलकांकडून पाठिंबा मिळाला आहे. बांगलादेशचे नवे प्रमुख बनलेले मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषिक मिळविणारे 32 वे व्यक्ती ठरले असून ते आता राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पार पाडणार आहेत. याआधी संपूर्ण जगात असे 31 लोक आहेत ज्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले आहे आणि त्यांनी राष्ट्रप्रमुखाची भूमिकाही बजावली आहे.