बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनात हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्यांकांच्या विरोधात गेले काही दिवस हिंसाचाराच्या घटना घडत आहेत . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे या संदर्भातले विधान समोर आले आहे.
बांगलादेश मधील अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्यित करत हत्या, लूटमार, जाळपोळ आणि महिलांवरील अत्याचार असह्य आहे. हिंदू मंदिरांसह अल्पसंख्यांकाचे प्रार्थना स्थळांवर होणाऱ्या हल्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अशा घटना ताबडतोब आणि कठोरपणे थांबवाव्यात. तसेच पीडितांच्या जीविताचे, मालमत्तेचे आणि आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी योग्य पाऊले उचलणे अपेक्षित आहे. या गंभीर काळात जागतिक समुदाय आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांनी बांगलादेशातील अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदू, बौद्ध इत्यादी समुदायांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याची विनंती आहे.
बांगलादेशातील परिस्थिती पाहता भारत सरकार शेजारील मित्र देश म्हणून योग्य भूमिका बजावत आहे. भारत सरकारला बांगलादेशातील हिंदू, बौद्ध इत्यादी लोकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.