पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहावे पदक जिंकले आहे. यावेळी भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत याने देशाची मान उंचावली आहे. त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. अमनने पोर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझचा १३-५ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. अमन सेहरावत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सातवा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
अमनला उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या रे हिगुचीकडून 0-10 असा पराभव स्वीकारावा लागला. पण आता अमनने कांस्यपदक जिंकून देशाला आनंद साजरा करण्याची आणि अभिमान बाळगण्याची संधी दिली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली असून त्यापैकी पाच कांस्य आणि एक रौप्य पदके आहेत. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर नेमबाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत मनू आणि सरबज्योत सिंगने दुसरे कांस्य जिंकले. स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. त्यानंतर हॉकी संघाने कांस्यपदक तर नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले. आता कुस्तीपटू अमनने कांस्यपदक जिंकून भारताला सहावे पदक मिळवून दिले आहे.