Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दुर्गम भागात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. अहलान गडोले परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिल्यातील कोकेरनाग परिसरातील अहलान गडोले भागात घेराबंदी करत शोधमोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिल्यानंतर ही चकमक उडाली.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच जवान जखमी झाले, त्यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे दोन जवान शहीद झाले. तर तीन जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चकमकीत दोन स्थानिक नागरिकही जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी शनिवारी कठुआ जिल्ह्यातील ढोक भागात चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले. दहशतवाद्यांबाबत ठोस माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे. कठुआमध्ये ८ जुलै रोजी मछेडी येथील दुर्गम जंगल परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या शोध पथकावर हल्ला केला होता. यामध्ये एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणजेच जेसीओसह पाच जवान शहीद झाले.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये 4 दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली, ज्यांना कठुआच्या उंच भागातील मल्हार, बानी आणि सोजधर जंगलात शेवटचे पाहिले गेले होते. प्रत्येक दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, जम्मूमधील भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवादी घटनांमध्ये वाढ लक्षात घेता, बीएसएफने सैन्याच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे आणि पंजाब-जम्मू आंतरराज्य सीमेवर सीसीटीव्ही बसवले आहेत.