भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी (Vikram Misri) आज दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर काठमांडू येथे पोहोचले.भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या भारतीय परराष्ट्र सचिव मिसरी यांचे नेपाळच्या परराष्ट्र सचिव सेवा लमसाल आणि नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी स्वागत केले.
परराष्ट्र सचिव मिसरी हे नेपाळच्या परराष्ट्र सचिव सेवा लमसाल यांच्याशी औपचारिक द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.ते आज दुपारी २.४५ वाजता राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची भेट घेणार आहेत. यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली, परराष्ट्र मंत्री डॉ आरजू राणा, काँग्रेस अध्यक्ष शेर बहादूर देउबा आणि माओवादी अध्यक्ष पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या भेटीचा कार्यक्रम आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ते सोमवारी मायदेशी परततील.
नेपाळमध्ये पोहोचलेले परराष्ट्र सचिव मिसरी म्हणाले की, त्यांचा दौरा नेपाळ-भारत संबंध अधिक दृढ करण्यासाठी आहे. भारत सरकारच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी अंतर्गत ते शेजारील देशांना भेटी देत असून भूताननंतर त्यांचा दुसरा परदेश दौरा नेपाळचा आहे. या भेटीदरम्यान द्विपक्षीय कराराच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र सचिव मिसरी यांचा दौरा दोन्ही देशांमधील नियमित उच्चस्तरीय बैठकांची परंपरा कायम ठेवेल आणि भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणांतर्गत नेपाळसोबतच्या संबंधांना दिलेले प्राधान्य प्रतिबिंबित करेल.
नेपाळमध्ये भारत सरकारच्या मदतीने प्रमुख पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि नवीन प्रकल्प सुरू आहेत. अलिकडच्या वर्षांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत झाल्याचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.